नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिंसेस (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठी 3 सप्टेंबर, 2023 रोजी संघ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी 14 जून,2023 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिेसेस (सीडीएस) या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 19 जून ते 1 सप्टेंबर, 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 61 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार पात्र राहील. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे बुधवार 14 जून,2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी www.mhasainik.maharashtra.gov. in या संकेतस्थळावर जाऊन पीसीटीसी नाशिक सीडीएस-61 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 ईमेल pctcoic@yahoo.in वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पाटील यांनी केले आहे.