नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंसंदर्भात आढावा बैठक काल संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी र.मो.खोडे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील धरणे, लघुपाटबंधारे, जलसाठे प्रकल्पात दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पानात भरीव वाढ होणार आहे. यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यापूर्वीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता. नव्या धोरणानुसार शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देण्यात येणार आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात येईल. व बहुभुधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असल्यास त्यास प्राथमिकता देण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व ठिकाणी गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव करुन जिल्हास्तरीय समितीस प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गाळ काढण्यासाठी अशासकीय संस्थाची निवड करण्यात येणार असून अशासकीय संस्थेने त्वरीत कामे सुरु करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
अनुदानाची मर्यादा
शेतकऱ्यांना पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रु.35.75 /- प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15 हजार च्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये 400 घनमीटर गाळाच मर्यादेत अनुदान देण्यात येईल. हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत म्हणजेच 37 हजार 500 अधिकाधिक देय राहील, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सुध्दा ही मर्यादा लागू राहील.
याठिकाणी होणार कामे
जिल्हास्तरीय समितीत मंजुरी मिळालेल्या नंदुरबार तालुक्यातील कोकणीपाडा, शनिमांडळ, ठाणेपाडा, पावला, धनीबारा, नवापूर तालुक्यात खोलघर, खेकडा, मुगधन, नावली, खडकी, खोकसा, सोनखडकी, सुलीपाडा, हळदाणी, विसरवाडी, शहादा तालुक्यातील दुधखेडा, कोंढावळ, लोंहरे, शहाणे, लंगडीभवानी,राणीपूर, तळोदा तालुक्यात रोझवा, गढावली, सिंगमपूर, पाडळपूर, धडगाव तालुक्यात उमराणी तर अक्कलकुवा तालुक्यातील महुपाडा लघु पाटबंधारे येथे कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.