नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 30 एप्रिल रोजी होणार बालविवाह थांबविण्यात अक्षता समितीला यश आले असून याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 29 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुजरात राज्यातील नवसारी येथील एका अल्पवयीन मुलीचा शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील एका मुलासोबत 30 एप्रिल रोजी बालविवाह होणार असून 29 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मिळाली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदरची माहिती जिल्हा स्तरावरील अक्षता समितीचे सदस्या श्रीमती नयना देवरे, सहा. पोलीस निरीक्षक, महिला सेल, नंदुरबार यांना कळवून पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता समिती मार्फत सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत आदेशीत केले.
जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अक्षता समितीचे सदस्यांच्या मदतीने बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीची माहिती काढली असता प्रकाशा येथे एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असल्याचे दिसून आले. म्हणून अक्षता समितीच्या सदस्यांनी तेथे हजर असलेल्या वर मुलाकडे व त्याच्या कुटुंबियांकडे नवसारी येथील वधू मूलीबाबत विचारपूस केली असता वधू मुलगी ही उदईक विवाहाच्या वेळी प्रकाशा येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी त्यांना वधू मुलीच्या जन्म तारखेबाबत विचारपूस केली असता मुलीचे वय 16 वर्षे 8 महिने असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अक्षता समितीने तेथे असलेल्या वधू मुलगा व त्याच्या नातेवाईकांना तसेच अल्पवयीन मुलीच्या पालकांसोबत फोनद्वारे संपर्क करून त्यांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई करण्यात येते याबाबत माहिती देवून त्यांचे समुपदेशन करुन त्यांचे मनपरिवर्तन केले. तसेच वधू मुलास व त्याच्या नातेवाईकांना शहादा पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.
सदर बालविवाह रोखण्यासाठी प्रकाशा येथे गेलेल्या अक्षता समितीकडून तेथील उपस्थित लोकांना व परिसरातील आजूबाजूच्या लोकांना बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगून लोकांमध्ये बालविवाह विषयी जनजागृती करण्याचे काम ऑपरेशन अक्षता समितीकडून वेळोवेळी केले जात आहे.
“ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात करण्यात आला असून आज पावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय बालविवाह समितीच्या सदस्या श्रीमती नयना देवरे, सहा. पोलीस निरीक्षक, महिला सेल नंदुरबार, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार, पोलीस नाईक विकास कापूरे, पुरुषोत्तम सोनार, शहादा पोलीस ठाणे नेमणूकीचे पोलीस हवालदार मेहरसिंग वळवी, पोलीस अंमलदार कृष्णा जाधव यांच्या पथकाने केली आहे.