नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांची तृष्णा भागविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभरात 30 ठिकाणी पाणपोईची उभारणी करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता खूप वाढलेली असते. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात पारा 40 ते 44 डिग्री सेल्सीयमच्या जवळपास असतो. जिल्ह्यातील बहुतांश लोक हे मजूरीसाठी बाहेरगांवी जातात. तसेच उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिक देखील खरेदीसाठी बाजारात आलेले असतात. जे विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त बाहेरगांवी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी परत येतात, अशा सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची थंडगार बाटली घेणे शक्य होत नाही.
अशा सर्व नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची सोय व्हावी तसेच त्यांना निःशुल्क पाणी उपलब्ध व्हावे आणि सर्वात महत्वाचे पाणपोईची दररोज स्वच्छता करुन त्यात स्वच्छ व थंडगार पाणी भरण्यात यावे अशी संकल्पना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली.या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप-आपल्या पोलीस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय करुन दिली.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँक कॉलनी, पोलीस ठाणे समोर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत रनाळा, आष्टा व कोरीट नाका, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत – काकाचा ढाबा जवळ, धानोरा गावात, नवापूर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणेसमोर, अग्रवाल भवन व सामान्य रुग्णालय येथे, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत जामा मशिद जवळ, स्टेट बँक येथे. शहादा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे समोर, बस स्थानक व जनता चौक येथे, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत- सारंगखेडा व वडाळी गावात, धडगांव पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व धडगांव गावात,
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर, कोचरा माता मंदीर व साई हॉस्पीटलजवळ, अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व खापर दुरक्षेत्र येथे, तळोदा पोलीस ठाणे हद्दीत तहसील कार्यालयजवळ, आंबीगव्हाण फाटा व बोरद येथे, मोलगी पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे व शहर वाहतूक शाखेसमोर असे एकुण 30 ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत नंदुरबार जिल्ह्यात पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत.नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पाणपोईचे सर्वत्र कौतूक होत असून नागरिकांचा देखील या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी देखील जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय उपलब्ध करुन दिली होती.