नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील नदी किनाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरुध्द मोलगी पोलिसात पोस्को कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील नदीकिनाऱ्यावर दि.१९ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास मोलगीचा सोराचापडा येथील राजेंद्र सायसिंग वळवी, रोहित अनिल तडवी व राकेश भामटा तडवी या तिघांनी संगनमत करुन एका १४ वर्षीय मुलीला जबरदस्तीने वडफळी येथील नदी किनारी नेऊन आळीपाळीने अत्याचार केला. राजेंद्र सायसिंग वळवी याने मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने नदी किनारी नेले होते. त्यानंतर तिघांनी तिच्यावर अत्याचार केले व सदर घटना कोणाला सांगितली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, याप्रकरणी पिडीत मुलीने तिच्या कुटूंबियांना या प्रकाराबाबत सांगितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३७६ (२), (जे), (एन), ३७६ (अ), ५०६, ३४ सह पोस्को कायदा २०१२ चे कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी अक्कलकुवा उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, मोलगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे यांनी भेट दिली आहे. तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.








