नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्रीय अर्थसंकल्पात बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा पातळीवर महिला सक्षमीकरणासाठी बचतगट भवन व मॉल उभारुन प्रयत्न करण्यात येतील. तसेच जिल्ह्याचा आर्थिकस्तर उंचाविण्यासाठी केंद्र सरकार आकांक्षित जिल्हा म्हणून विशेष निधी देण्यात येत असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.
नंदुरबार येथे वंजारी समाज मेळावा, आकांक्षित जिल्हा म्हणून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री डॉ.कराड नंदुरबार येथे आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हीना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा अग्रणी बॅकेचे मॅनेजर श्री.गांगुर्डे उपस्थित होते. यापुढे मंत्री डॉ.कराड म्हणाले, राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम व गडचिरोली या चार जिल्ह्यांचा आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली असून या जिल्ह्यांच्या विकासासाठी विशेष निधी देण्यात येत आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलो आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात समाधानकारक सुधारणा झाली आहे. मात्र जिल्ह्याला विकसित जिल्ह्याच्या वाटेवर न्यावयाचे आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यात येतील. त्याचप्रमाणे स्थलांतरामुळे कुपोषण देखील वाढते आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर जिल्ह्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बॅँकांच्या माध्यमातून लघु उद्योगांना निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बॅँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. खा.डॉ.हीना गावित यांनी जिल्ह्यासाठी १७ बॅँकांच्या शाखांची आवश्यकता असल्याची मागणी केली होती. त्यातील तीन शाखा सुरु होणार असून येत्या महिन्याभरात या कामाला गती देऊन आणखी आठ ते १० बॅँकाच्या शाखा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
देशात ८० लाख बचतगट असून बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर केंद्र सरकार भर देत आहे. नंदुरबार जिल्हास्तरावर बचतगट भवन उभारुन त्याच ठिकाणी मॉल उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे बाजारपेठ उपलब्ध होवून आर्थिकस्तर उंचावण्यास मदत होणार आहे. डेल्टा बॅँकींगमध्ये जिल्ह्याचे काम समाधानकारक असले तरी यास गती देण्याची गरज डॉ.कराड यांनी व्यक्त केली. बॅँकांमध्ये रिक्त पदांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून १० लाख नोकऱ्या देण्यात येणार असल्याचेही डॉ.कराड यांनी सांगितले.