नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले संबंधितांवर कारवाई न झाल्यास जिल्हा परिषदेला टाळे ठोकण्याचा इशारा या वेळी दिला.
नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती संगीता नाईक, गणेश पराडके, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व जि.प. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सभेत नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी गेलेल्या एका आदिवासी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आल्याची घटनने बाबत जि. प.विरोधी पक्षनेते रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला.घटना घडल्यानंतर याबाबत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संबंधित महिलेने तक्रार केली आहे. मात्र तरी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेतली नाही. मात्र जि.प.प्रशासनाने सदरची बाब गांभीर्याने न घेता संबंधितांना पाठीशी घातले. यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करा अन्यथा जिल्हा परिषदेला टाळे ठोकणार असा इशारा जि.प.सदस्य भरत गावित यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले.दरम्यान, याप्रकारानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे सभेत आले असता जि.प.सदस्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत राकसवाडे येथील आरोग्य केंद्रात चौकशीसाठी पथक रवाना करुन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.








