नंदुरबार ! प्रतिनिधी- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हट्टी खुर्द गावात छापा टाकत एका घरातून सव्वा चार लाखांची अफूची बोंडे जप्त केली. काल दि. 28 रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. संशयित फरार झाला असून त्याच्याविरुद्ध निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द गावातील गोरख भगत उर्फ गोरख रामचंद्र पदमोर याने त्याच्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या
मार्गदर्शनाखाली त्याच्या पथकाने गोरख भगत यांच्या घरी छापा टाकला. त्या दरम्यान संशयित पसार झाला. पथकाने घराची तपासणी केली असता 9 गोणीमध्ये अफूची सुकलेली बोंडे भरलेली आढळून आली. एकूण 4 लाख 35 हजार 750 रुपये किमतीची 62 हजार 250 किलो अफूची सुकलेली बोंडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ प्रकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून गोरख भगत याच्याविरुद्ध एनडीपीएस एक्ट कलम 8 (क), 18,19 प्रमाणे निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सचिन शिरसाठ हे करीत आहेत.