नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे. सदर पोटनिवडणूकीत कोरोना नियमांचे पालन करुन निवडणूका पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील पाच गटांसाठी पोटनिवडणूक होणार असून यात १ लाख १ हजार ७४२ मतदार हक्क बजावणार आहेत. तर पाच गणांसाठी ३७ हजार ९०७ मतदार हक्क बजावणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील ११ गट व १४ गणातील सदस्यांचे सदस्यत्व आरक्षणाच्या मुद्यावर रद्द करण्यात आले आहेत. यामुळे रिक्त असणार्या गट व गणातील जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रिक्त असणार्या पाच गट व गण तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी काल नंदुरबार तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर म्हणाले, सोमवार दि.१९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेदरम्यान मतदान होणार आहे. तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी २९ जून ते ५ जुलै असणार आहे. दि.६ जुलै रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे व त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दि.९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकार करण्याबाबत किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायाधिशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ९ जुलै असणार आहे. नामांकन मागे घेण्याची तारीख १२ जुलै तर अपील आहे तेथे नामांकन मागे घेण्याची तारीख १४ जुलै असणार आहे. दि.१४ रोजी प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून निशाणी वाटप होणार आहे.
दि.१९ रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी होणार असल्याचे सुधळकर यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार तालुक्यात पाच गट तर पाच गणांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यात कोळदे गटासाठी एकूण १७ हजार ८२ मतदार हक्क बजावणार आहे. तसेच खोंडामळी गटासाठी २४ हजार ११६, कोपर्ली गटासाठी २० हजार ४०६, रनाळा गटासाठी २० हजार १२० तर मांडळ गटासाठी १० हजार १८ असे एकूण पाच गटांसाठी १ लाख १ हजार ७४२ मतदार आहेत. तर पंचायत समितीच्या पाच गणांंमध्ये गुजरभवाली गणासाठी ११ हजार १९३, पातोंडा गणासाठी ९ हजार ९८७, नांदर्खे गणासाठी ८ हजार ४८० तर गुजरजांभोली गणासाठी ४ हजार २४७ मतदार आहेत. तर होळतर्फे हवेली या गणाचा निर्वाचन विभाग गट क्र.३८ कोळदे यामध्ये समाविष्ट आहे.दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करुन पोटनिवडणूक पार पडणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून निरंक वातावरणात पोटनिवडणूक पार पडण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सुधळकर यांनी दिली.