नंदूरबार l प्रतिनिधी
अविष्कार फाउंडेशन इंडिया, कोल्हापूर ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने सोलापूर येथे करण्यात आले. या पुरस्कारासाठी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्यातून सौ.चेतना दिनेश पाटील यांची निवड करण्यात आली.
या पुरस्कार सोहळ्यास सोलापूर सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे , सोलापूर जि.प .चे मुख्य कार्यकारी अधिकारी, बार्शी येथील संचालक सचिन वायकुळे, अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते. सौ.चेतना पाटील यांना यापूर्वी कुणबी पाटील युवा मंच तर्फे समाज भूषण ,समाज रत्न तथा महिला सक्षमीकरणाबद्दल सामाजिक पुरस्कार , सावित्री बाई फुले पुरस्कार, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार मिळालेले आहेत.

ज्ञानरचनावादी अध्यापनातील त्यांचे कार्य पाहून त्यांची निवड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ बालभारती पुणे यांच्या पाठ्यपुस्तक परीक्षण यासाठी करण्यात आली आहे. श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल,नंदुरबार येथे गेल्या बारा वर्षापासून कार्यरत असून त्यांनी मराठी विज्ञान परिषद, नंदुरबार विभागामार्फत विविध उपक्रम राबविले आहेत. सार्वजनिक शिक्षण समिती, देव मोगरा एज्युकेशन सोसायटी तसेच नंदुरबार तालुका विधायक समिती या संस्थांमध्ये भूगोल या विषयाच्या कृतीयुक्त कार्यशाळा घेतल्या आहेत. आशापुरी फाउंडेशन मार्फत त्या आईन्स्टाईन रोबो क्लब व नक्षत्र छंद मंडळ विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी चालवत असतात. महिला सक्षमीकरण बेटी बचाव बेटी पढाव यासारखे उपक्रम चेतना पाटील राबतात. यापूर्वी उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून त्यांचा अनेकदा सन्मान करण्यात आला आहे.
त्यांनी मार्गदर्शन केलेल्या अनेक उपकरणांना राष्ट्रीय स्तरावर व राज्यस्तरावर पुरस्कार मिळालेले आहेत. विज्ञान मेळावा, विज्ञान नाटिका विज्ञानावर आधारित अनेक उपक्रमातून सक्रिय सहभाग असून यावर्षी त्यांचे उपकरण राष्ट्रीय स्तरासाठी निवडले गेलेले आहे. खगोल अभ्यासक म्हणून अनेक खगोलीय घटांनाचा आनंद नंदुरबार करांना देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
वस्तू शास्त्राच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून वास्तू अभ्यासक आहेत वास्तू तज्ञ म्हणून विनामूल्य मार्गदर्शन करतात. या सर्व गोष्टींचा विचार करता अविष्कार फाउंडेशने राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.








