खेतिया l प्रतिनिधी
मोठ्या शहरातील तसेच पाश्चात्त्य देशातील अनिष्ट प्रथांचे गत काही दिवसांत मंगल समयी मोठ्या प्रमाणात अंधानुकरण केले जात आहे.काही अनिष्ट प्रथा गेल्या दोन-चार वर्षांपासून थेट ग्रामीण भागात पोहोचत आहेत.मात्र खर्चिक व संस्कृतीहीन कुप्रथा बंद व्हाव्यात यासाठी आता जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावातून धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. समाज हित समोर ठेवून उपवर-वधू कुटुंबीयांकडून याबाबत एकमुखी घोषणा केली जात आहे.समाजातील कुप्रथा बंद करण्याच्या या घोषणेचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.
परदेशासह दिल्ली, बंगलोर, पुणे,मुंबई यासारख्या पंचतारांकित शहरातील मंगल प्रसंगी आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम गत काही वर्षांपासून ग्रामीण भागात पोहोचले आहेत.शहरी भागातील अनावश्यक प्रथांना गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात समाज मान्यता मिळत असल्याचे चित्र सर्व दूर दिसून येत आहे. कोरोनाच्या दोन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर आता धुमधडाक्यात मंगल प्रसंग साजरे केले जात आहेत. जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा,नवापूर परिसरातील मध्यमवर्गीय विविध धर्मीयांच्या विवाह समारंभात आधुनिकतेच्या नावाखाली रिंग सेरेमनी, प्री-वेडिंग शूट, मेहंदी रसम, नाच गाणी आदी प्रकारांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू झाली आहे.
आनंदोत्सव साजरा करतांना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च होण्यासोबतच आपल्या आदर्श संस्कृतीचे विद्रुपीकरण होत असल्याची प्रतिक्रियाही उमटत आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांकडे आयोजित करण्यात येणाऱ्या अशा कार्यक्रमाबाबत क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहेत.मंगल समयी उत्साही वातावरण असणे आवश्यक आहे, मात्र संस्कृतीहीनतेचे सामाजिक प्रदर्शन योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अशा कार्यक्रमांबाबत समाज माध्यमांसह समाजात मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. गरज नसतांना उपवर-वधू पालकांच्या दृष्टीने खर्चिक असलेल्या व भारतीय आदर्श संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन कशासाठी करावे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा सामाजिक कुप्रथांना हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावातून सध्या ठराव करण्यात येत आहेत. यासाठी कोरीट, बोरद, सावळदा ,तराडी तबो, शिंदे, प्रकाशा, होळ मोहिदे, मोहिदा तह, मोहिदा तश ,बामखेडा तत आदि गावातील मुलींसह त्यांच्या पालकांनी पुढे सरसावत गावातून या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी ठराव संमत केले आहेत.
वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याच्या ठरावही संमत केला जात आहे. सुमारे पाच दशकांपूर्वी परिसराचे भाग्यविधाते अण्णासाहेब पी.के.पाटील यांनी समाजातील हुंडा पद्धत बंदी तसेच पंक्तीतील अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याबाबत सामाजिक सुधारणा केली होती. आता गुर्जर समाजाचे विद्यमान अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील व प्रा.मकरंद पाटील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून या कुप्रथा बंदीसाठी घेण्यात येणाऱ्या एकमुखी ठराव संमतीचे स्वागत करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गुर्जर बहुल गावांनी घेतलेल्या या हितावह निर्णयाचे अनुकरण इतरही समाज बांधवांनी करणे काळाची गरज ठरणारे आहे. खर्चिक व संस्कृतीही कार्यक्रमांचे मंगलप्रसंगी आयोजन करून विनाकारण होणारा खर्च यामुळे टळणार असून संस्कृती रक्षणाच्या उद्भवणारा प्रश्नही वेळीच थांबणार आहे.अशी प्रतिक्रिया जनसामान्यांसह समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत.
–
‘आर्थिक परिस्थिती सक्षम असलेली कुटुंबे अनावश्यक बाबींवर खर्च करू शकतात. मात्र समाजातील सर्वच घटकांचा विचार करता कुप्रथा व निरर्थक बाबींना मंगलप्रसंगी दूर ठेवणे काळाची गरज आहे. सामाजिक सुधारणांचा प्रारंभ स्वतः पासून करणे खरा आदर्श निर्माण करणारी बाब असते.आपल्या चिरंजीवांच्या मंगलप्रसंगी खर्चिक व अनिष्ट प्रथांना आपण दूर ठेवणार आहोत.’
प्रा.मकरंद पाटील,
समन्वयक,पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा
अखिल भारतीय लेवा पाटीदार गुजर समाजाचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय गुर्जर महासभा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांनी सांगितले की सहकार महर्षी अण्णा साहेबांनी समाजासाठी अनिष्ट प्रथा ना पाय बंदी लागावी त्यासाठी १९ नियमांची समाजाने अधिवेशनात नियमावली तयार केली होती त्याचे पालन आज पर्यंत होत आहे परंतु आताच्या आधुनिक काळात प्री-वेडिंग शूटिंग रिंग सेरेमनी मेहंदी रस्म आदी कार्यक्रम होत आहे त्यासाठी महिला बंधू भगिनी तरुण मुले मुले यांनी अनाठाई खर्च होत आहे तो समाजाच्या बंधू-भगिनींनी गावोगावी बैठका घेऊन त्यावर पाय बंदी वावी त्यासाठी बैठका घेऊन बंदी करण्यात आली आहे.








