नंदुरबार l प्रतिनिधी
सीहोर येथील प्रसिध्द शिवकथाकार पंडित प्रदीप मिश्रा हे नंदुरबारात गुढीपाडवा, रामनवमी किंवा अक्षय तृतीयेला येण्याची शक्यता आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निमंत्रीत करण्यात आले असल्याची माहिती रघुवंशी यांनी दिली.
आमदार रघुवंशी हे नंदुरबारातील ज्ञानदीप सोसायटीतील ओंकारेश्वर महादेव मंदीरात कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी सांगितले, नंदुरबारातील हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. तीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर येण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
हॉस्पीटलच्या उद्घाटनांतर एक किंवा दोन तासांची शिवमहापुराण कथा देखील होणार आहे. त्यांना पुर्ण सात दिवसांच्या कथेसाठी आमंत्रीत करण्यात आले, परंतु येत्या एक ते दीड वर्षापर्यंत त्यांच्या तारखा बूक असल्याने ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एका दिवसाच्या दौऱ्यावर ते येणार असल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असतील. त्यांनाही निमंत्रीत करण्यात येणार असल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, माजी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पवार, मनिषा चेतन वळवी आदी उपस्थित होते.








