नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील वलवाल सावरीपाडा येथे गाडी चोरल्याच्या संशयातून वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील वलवाल सावरीपाडा येथील अनिल सुकलाल पावरा यांनी किसन लेहऱ्या पावरा व रोहिदास ताऱ्या पावरा यांनी गाडी चोरल्याच्या संशय घेतल्याचा राग आल्याने अनिल पावरा यांना किसन पावरा व रोहिदास पावरा यांनी वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी दिली.
सदर त्रासाला कंटाळून अनिल पावरा यांनी राहत्या घराच्या बाजूच्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत सुकलाल ओल्या पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३०६, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील करीत आहेत.