म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथे आढळलेल्या ऐतिहासिक तोफांच्या पार्श्वभुमीवर अरुण हरी पाटील यांच्या घराचे बांधकाम व खोदकाम त्वरीत थांबवण्यात यावे तसेच तोफांचे स्थलांतर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवास करण्यात येवू नये, असे आदेश पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक सौ.आरती आळे यांनी शहादा तहसिलदारांना दिले आहेत.
तालुक्यातील पाडळदा येथील अरून हरी पाटील यांच्या घराचे बांधकामासाठी मजूर खोदकाम करीत असताना त्यांना पाईप सारखी वस्तू दिसून आली त्यांनी पुन्हा खोदकाम केले असता त्यांना ऐतिहासिक तोफा आढळून आल्या मजूर सुरेश ठाकरे यांनी घरमालक यांना याची महिती दिली. त्यांनी लागलीच शहादा पोलीसानी दिली. तलाठी गायकवाड यांनी पंचनामा करून त्याची माहिती प्रशासना ला दिली.हे ऐतिहासिक वस्तू गावात ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.या तोफा चार ते पाच फूट आकाराच्या पंचधातूंच्या व एक पितळी आहे.हे पुढच्या बाजूने गोलाकार तर मागील बाजू ने गोळा टाकण्यासाठी जागा आहे.या तोफावर काही ही लिखाण नाही.याचे वजन सहा किंटल वजनाचे आहे.
दरम्यान या वृत्ताची माहिती मिळताच नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक सौ.आरती आळे यांनी शहादा तहसिलदारांना पत्र दिले आहे. या पत्रात म्हटले आहे, मौजे पाडळदा येथे खोदकामात पंचधातूच्या तोफा आढळून आल्या आहेत. अरुण पाटील यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी सुरु असलेल्या खोदकामात लोखंडाच्या जड व लांब वस्तू आढळून आल्या आहेत.
त्या बाहेर काढल्यानंतर त्यात एकुण १० तोफा मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, पाडळदे येथील अरुण पाटील यांच्या घराचे बांधकाम व खोदकाम त्वरीत थांबविण्यात यावे.तसेच याठिकाणी मिळालेल्या तोफांचे स्थलांतर पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय करण्यात येवू नये. तोफा मिळालेल्या ठिकाणची तसेच तोफांची पाहणी केल्यानंतरच सदर बांधकाम करावे किंवा कसे याबाबत सुचना दिल्यानंतरच काम सुरु करण्यात यावे, असेही सौ.आळे यांनी पत्रात म्हटले आहे.








