नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे शासकीय आश्रमशाळेच्या मागील बाजूच्या शेतात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला असून सायंकाळी उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .
याबाबत अधिक माहिती अशी की, भालेर ता.नंदुरबार येथे शासकीय आश्रमशाळेच्या आवारात नवीन वसतिगृहांचे बांधकाम सुरू आहे . त्यासाठी ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर बाहेर गावाहून व परप्रांतीय मजूर आणले आहेत . शनिवारी दि.२६ जून रोजी सकाळी रखवालदार नरेंद्र पाटील यास कुंपणाच्या पलीकडे एक व्यक्ती पडलेली दिसल्याने तेथे जाऊन पाहणी केली असता घातपाताचा प्रकार लक्षात आला.त्वरित पोलिसांना खबर देण्यात आली . घटनास्थळी पोलिसांना एक तरुण व्यक्ती मृत स्वरूपात आढळून आली .या व्यक्तीस मारहाण केल्याच्या खुणा दिसून आल्या . जागेवरच न्यायवैद्यक टीमला पाचारण करून तपासणी करण्यात आली . पुढील कार्यवाहीसाठी शव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले . घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील , स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर , उपनिरीक्षक कमलाकर चौधरी , योगेश चौधरी , संदीप हिरे , पोलीस पाटील प्रशांत मगरे , तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी भेट दिली .