नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपाच्या नेत्या व भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना खडकी तालुका धडगाव येथील विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील आरोपी व दोषी अधिकाऱ्यांची योग्य ती चौकशी होऊन कारवाई होणे तसेच मोख तालुका धडगाव येथील पेचरीबाई जान्या वसावे यांना डाकीण ठरवून त्याचा अमानुष छळ करणाऱ्या आरोपींची योग्य ती चौकशी होऊन उचित कारवाई होणेबाबत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेतर्फे निवेदन देण्यात आले.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी खडकी तालुका धडगाव येथे मयत पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेतर्फे त्यांना या घटनेबाबत निवेदन देण्यात आले. खडकी तालुका धडगाव येथील विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. यातील पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी केलेले दुर्लक्ष अक्षम्य आहे.
गावकऱ्यांना या प्रकरणात एकजूट करूनही पोलीस विभाग मात्र तक्रार घेत नाही ही अत्यंत चीड आणणारी बाब आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून पीडीतेच्या पित्याने तिच्या मृतदेह मिठात सुरक्षित ठेवला, अशा घटना या मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहे. यामुळे प्रकरण मागे मोठी शक्ती कार्यरत असल्याच्या संशय निर्माण होतो आहे, तरी या प्रकरणाची विशेष चौकशी समिती द्वारे होणाऱ्या चौकशीद्वारे पीडिता व तिच्या कुटुंबियांना न्याय द्यावा व संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात यावी.
तसेच मोख तालुका धडगाव येथील पेचरीबाई जान्या वसावे यांना डाकीण ठरवून त्याचा अमानुष छळ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यात संबंधित महिलेला मारहाण, शिवीगाळ करत तुम्ही डाकीण आहात, आमच्या माणसांना मारून खाऊन टाकले असा आरोप करीत गावात राहू देणार नाही असे सांगून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. संबंधित प्रकरणामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून संबंधित लोकांना प्रबोधन व कायद्याद्वारे कठोर शिक्षा देणे गरजेचे झाले आहे.
धडगाव व सातपुडा परिसरात या प्रकाराची अनेक प्रकरणे वारंवार घडत आहे. या साठी उपाययोजना व कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे विनंती आहे. महिलांना या छळाला सामोरे जावे लागत असल्याने आपण तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार रक्षा परिषदेतर्फे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना निवेदन देऊन करण्यात आले.
त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हाधिकारी सौ. मनीषा खत्री, नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेचे राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष विष्णू जोंधळे, सचिव डॉ. प्रफुल्ल सुरेश पाटील, सहाय्यक सचिव प्रा. हितेंद्र सतीश चौधरी उपस्थित होते.








