नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डोंगरगाव रस्त्यावर ॲपेरिक्षाला दुचाकीने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील चालक महेंद्र जयसिंग गिरासे ॲपेरिक्षाने (क्र.एम.एच.१५ बी ३२१५) शहादा-डोंगरगाव रस्त्याने जात होते. यावेळी दिनेश राजेंद्र मोरे (रा.मंदाणा ता.शहादा) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून श्रीराम सिटी कॉलनी रस्त्यावर ॲपेरिक्षाला जबर धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात ॲपेरिक्षातील सुभाष पाटील हे ठार झाले. तर शांतीलाल रघुनाथ पाटील, दरबारसिंग धुडकू गिरासे, जिजाबाई सुभाष पाटील व सुनंदाबाई भैय्या पाटील व चालक महेंद्र गिरासे यांना दुखापत झाली.
तसेच वाहनांचेही नुकसान झाले. याबाबत रविंद्र बन्सीलाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात दिनेश मोरे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.तारसिंग वळवी करीत आहेत.








