नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार व शहादा तालुक्यातील १३७ ग्रामपंचायतीसाठी काल दि.१८ सप्टेंबर रोजी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदारांनी मोठया उत्साहात सहभाग घेतल्याने नंदुरबार तालुक्यात ८२.०९ टक्के तर शहादा तालुक्यात ७५.३९ टक्के मतदान झाले. किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान पार पडले. उद्या दि.१९ सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नंदुरबार व शहादा तालुक्यातील १४९ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज माघार अंतीम दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने नंदुरबार शहादा तालुक्यातील प्रत्येकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील सुतारे, भवानीपाडा, देवपुर, नटावद, पथराई व वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान काल दि.१८ सप्टेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सकाळीपासूनच मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
नंदुरबार तालुक्यात एकूण ४७ हजार ५५ स्त्री मतदार तर ४५ हजार २७६ पुरूष मतदार असे एकूण ९२ हजार ३३१ मतदार आहे. पैकी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान १२.९५ टक्के,११.३० वाजेपर्यंत ३२.३२ टक्के, १ वाजेपर्यंत ५२.२२ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६५.१६ टक्के तर मतदान संपण्याचा वेळेपर्यंत ३७ हजार ८७९ स्त्री मतदार तर ३७ हजार ९२५ पुरूष मतदार असे एकूण ७५ हजार ७९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नंदुरबार तालुक्यात एकूण ८२.०९ इतके टक्के मतदान झाले. तर शहादा तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ५०० उमेदवार रिंगणात असून त्यासाठी २४३ मतदान केंद्रावर १४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. शहादा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींसाठी ६० हजार ३६० स्त्री मतदार तर ६२ हजार २०८ पुरूष असे एकूण १ लाख २२ हजार ५१५ मतदार आपला मतदार होते.
पैकी सकाळी ७.३० ते ९.३० वाजे दरम्यान १६.२२ टक्के, ७.३० ते ११ वाजेदरम्यान ३६.३७ , दुपारी १ वाजेपर्यंत ५६.३३ टक्के, दुपारी ३.३० वाजेपर्यंत ६४. ४७ टक्के, सकाळी ७.३० ते मतदार संपेपर्यंत ४४ हजार ६७४ स्त्री मतदार तर ४७ हजार ६८५ पुरूष मतदार असे एकूण ९२ हजार ३५९ असे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
शहादा तालुक्यात ७५. ३९ टक्के इतके मतदान झाले. नंदुरबार व शहादा तालुक्यातील काही संवेदनशील केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान नंदुरबार येथील वखार महामंडळात तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होईल.नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत मतदान सुरू होते. रात्री उशिरापर्यंत कर्मचार्यांनी व वखार महामंडळात मतदान साहित्य जमा केले.








