नंदुरबार l प्रतिनिधी-
ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या दुःखद निधनाने शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दुःख व्यक्त केले आहे. साधी राहणीमान व उच्च विचार सरणी असलेले ‘दादा’ हरपल्याने कधीही पोकळी भरून निघणार नाही असे रघुवंशी यांनी सांगितले.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शोक व्यक्त करतांना सांगितले की,स्व. माणिकराव गावित यांच्याशी सहा दशकांपासून रघुवंशी कुटुंबीयांचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकारणातील एक आदर्श असे व्यक्तिमत्व माणिकराव दादा होते. खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,राजीव गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या परिवाराशी अगदी जवळचे संबंध होते. माणिकराव गावित यांची थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारलेली असतांना देखील त्यांनी कधीही बाऊ केला नाही.
आदिवासी समाजाच्या सच्च्या पाईक, सेवक असणाऱ्या माणिकराव दादांवर ज्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी लोकसभेत खुद्द विरोधी पक्षातील सुषमा स्वराज यांनी दादांवरील चुकीचे आरोप फेटाळून लावले होते. माणिकराव दादांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकल्यानंतर दुःखाचे डोंगर कोसळल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले








