नंदुरबार l प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील खडक्या येथील विवाहित मुलीवर अत्याचार होवून खून झाल्यानंतर तिच्या न्यायासाठी वडीलांनी तिचा मृतदेह ४४ दिवस खड्डयात मिठामध्ये पुरून ठेवला याप्रकरणी मुंबई येथे पुर्न शवविच्छेदन करण्यात आले .दरम्यान या गुन्ह्यातील तपासासाठी ाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी . शेखर पाटील यांनी वशेष तपास पथक स्थापन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव पोलीस ठाणे अंतर्गत रंजीत जत्र्या ठाकरे रा. वावी ता. धडगाव याच्या विरुध्द् दि. २ ऑगस्ट २०२२ रोजी धडगांव पोलीस ठाणे येथे भांदवि क ३०६ , ३०२ , ३७६ ( अ ) , (ड) , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्यातील आरोपी रंजीत ठाकरे याच्यासह त्याचे इतर दोन साथीदार सुनिल ऊर्फ कुटा प्रताप ऊर्फ हाना वळवी, अमर ऊर्फ प्रताप गोटु ऊर्फ हाना वळवी दोन्ही रा . कुंवरखेत ता . धडगांव यांना देखील तात्काळ अटक करण्यात आलेली आहे .
सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा विभाग श्रीकांत घुमरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे . दि.१६ सप्टेंगर २०२२ रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी . शेखर पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले असून त्यात तपास प्रमुख उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा . पोलीस निरीक्षक , महिला सुरक्षा कक्ष श्रीमती नयना देवरे यांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर तपास पथक हे नमुद गंभीर गुन्ह्यात कुठलीही त्रुटी राहाणार नाही याकडे विशेष लक्ष देवून सदर गुन्ह्याचा तपास करणार आहे .
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांची विशेष तपास पथकाच्या तपासावर देखरेख राहील . तसेच ते विशेष तपास पथकाने केलेल्या तपासाचा वेळोवेळी आढावा घेतील व गुन्ह्याचा तपासावर योग्य पर्यवेक्षण करणार आहेत . सदर गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस पथकाकडून सविस्तर वेगाने व मुदतीत पुर्ण करण्यात येईल व वेळेत न्यायालयात आरोपीतांविरुध्द् दोषारोपपत्र सादर करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले आहे.








