नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज दि. 6 सप्टेंबर रोजी अर्ज माघारीची शेवटच्या दिवशी लोकनियुक्त सरपंच पदासाठी ८९ तर सदस्य पदासाठी २७३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सहा सरपंच बिनविरोध झाले असून ६१५ जागांसाठी ११८६ तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी २१९ जण रिंगणात आहेत.
तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती माघारीअंती सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. ३२ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे.
माघारीअंती २५७ जणांनी माघार घेतल्याने ६१५ सदस्यांच्या जागांसाठी ११८६ उमेदवार रिंगणात आहेत तर ६९ सरपंचांसाठी २१९ जण रिंगणात आहेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण ९३ जणांनी माघार घेतल्याने २१९ जण रिंगणात आहेत.
सहा सरपंच बिनविरोध
माघारीअंती ७५ पैकी सहा ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. यात सुतारे, भवानीपाडा, देवपूर, नटावद, पथराई, वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
३२ लोकनियुक्त सरपंचांसाठी सरळ लढत
माघारीअंती सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ३२ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे.यामध्ये अजेपूर, अंबापूर, बिलाडी,आष्टे, बालआमराई, धीरजगाव, गंगापूर,घोगळगाव,पाचोराबारी, जळखे, श्रीरामपूर, शिरवाडे, ठाणेपाडा,विरचक, आर्डीतारा, धुळवद, मालपूर, निंबोणी, निमगाव,राजापूर, शेजवे, वेळावद, इंद्रीहट्टी, दहिंदुले बु, दहिंदुले खु, पिंपरी, सुंदरदे, करजकुपे, होळतर्फे हवेली, खोडसगाव, कोळदे, पळाशी,शिंदे, वाघोदा या ग्रामपंचायतींमध्ये लोकनिुयक्त सरपंच पदासाठी सरळ लढत होणार आहे.








