शहादा l
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ व श्री.पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या वतीने कै. अण्णासाहेब पी.के.पाटील स्मृती आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेचे दि.20 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सहकार व शिक्षण महर्षी कै. अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण, सहकार व समाज सुधारणा यासाठी अर्पण केले. दि. 18 सप्टेंबर 2014 रोजी त्यांच्या देह अनंतात विलीन झाला. कै. अण्णा साहेबांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी दि. 20 सप्टेंबर मंगळवारी आंतर महाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वकृत्व स्पर्धेचे ऑफलाइन आयोजन करण्यात आले आहे .
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयीन स्तरावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेसाठी अमृत महोत्सवी भारत, सहकार चळवळीचे भविष्य, गड्या आपला गाव बरा,आजची प्रासंगिक मूल्य हे चार विषय ठेवण्यात आले आहेत. विजेत्यांना प्रथम पारितोषिक दहा हजार रुपये, द्वितीय सात हजार रुपये, तृतीय पाच हजार रुपये स्पर्धक व महाविद्यालयास विभागून दिले जाणार आहे.
तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रुपये एक हजारचे स्पर्धकास दिले जातील. दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ होईल. उद्घाटन कार्यक्रम सकाळी नऊ वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील व सचिव श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते होईल.
पारितोषिक वितरण त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी माजी प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, उपप्राचार्य प्रा.कल्पना पटेल,प्रा. डॉ.विजयप्रकाश शर्मा,प्रा.डाॅ.तुषार पाटील,प्रा.डाॅ.चंद्रशेखर सुतार यांची संयोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सहभाग घेण्याचे आवाहन उपाध्यक्ष जगदीश पाटील आणि शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांनी केले आहे.








