नंदुरबार l
३० एप्रिल २०२२ पर्यंत वरिष्ठ (चट्टोपाध्याय) वेतन श्रेणी संबंधित सर्व प्रस्ताव तालुकास्तरावरून जिल्हा कार्यालयात जमा केले होते. ३० एप्रिल २०२२ अखेर जमा ५५७ प्रस्तावाबाबत कोणतीही हालचाल जिल्हा कार्यालयातून सुरू होत नसल्याचे शिक्षक परिषदेच्या निदर्शनास आल्याने शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्यावतीने निवेदन देऊन सदर प्रस्ताव निवड समिती समोर ठेवून आदेश काढण्याबाबत विनंती केली होती.
याकामी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र शिक्षक बांधवांची शिक्षक परिषदेस वारंवार विचारणा होत असल्याने २७ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या समोर चटोपाध्याय वेतनश्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन निवेदन देत सात दिवसाच्या आत सदर प्रस्ताव निवड समितीसमोर सादर करावेत, असे न झाल्यास शिक्षक परिषद आंदोलनाच्या भूमिकेत राहील अशी विनंतीपूर्वक सूचना श्री.काळे यांनी केली असता सदर प्रलंबित प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण विभागाकडून तात्काळ कारवाई सुरू केली.
परंतु जिल्ह्यातील धडगाव आणि नवापूर यांची हार्डकॉपी व सर्वच तालुक्यांची सॉफ्टकॉपी नसल्याने प्रस्ताव प्रस्तावित करणे शक्य नसल्याने शिक्षक परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी तालुक्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी जिल्हा कार्यालयात तात्काळ जमा करण्याबाबत विनंती केली.
तालुका स्तरावरुन प्राप्त प्रस्तावांची यादी हार्ड कॉपीसह आपल्या तालुक्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी त्रुटींची पूर्तता ३० जून पर्यंत करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी यांच्या पत्राद्वारे देण्यात आले होते. संदर्भीय पत्रांवर सर्व तालुका आस्थापनांकडून ५५७ शिक्षक, केंद्रप्रमुख २७, पदोन्नती मुख्याध्यापक ५, विषय शिक्षक २ असे एकूण ५९१ वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले होते.
त्यापैकी ३५३ प्राथमिक शिक्षक, २ विषय शिक्षक, २७ केंद्रप्रमुख, ४ पदोन्नती मुख्याध्यापक असे एकूण ३८६ पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्तावांच्या त्रुट्या तालुकास्तरावर पाठवून लवकरच त्यांनाही मंजुरी देण्यात येईल. प्रस्तावांची संख्या पाहता प्रत्येक प्रस्ताव छाननी करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता तसेच जलदगतीने सदर प्रकरण निकाली काढणे आवश्यक असल्याने सदर कामात शिक्षक परिषदेने स्वतःहून प्रशासनास सहकार्य करण्याचे सांगितले.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री प्रकाश बोरसे यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या कामाला गती देऊन आज ५ सप्टेंबर रोजी ५९१ पैकी नंदुरबार ६८, नवापूर ३१, शहादा ९३, तळोदा ४३, अक्कलकुवा ५९, धडगाव ५९ असे एकूण ३५३ प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
२७ केंद्रप्रमुख, ४ पदोन्नती मुख्याध्यापक, २ विषय शिक्षक असे एकूण इतर संवर्गाचे ३४ पैकी ३३ प्रस्ताव निवड समितीने मंजूर केले आहेत. तसेच उर्वरित शिक्षकांचे प्रस्ताव त्रुटीमुळे फेटाळण्यात आलेले आहेत. वरिष्ठ वेतन श्रेणीच्या जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावपैकी प्राथमिक शिक्षकांच्या ५५७ पैकी ३५५ तसेच इतर संवर्गाचे ३४ पैकी ३३ वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून २०२ प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची त्रुटी पूर्ण करून प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे.
यासाठी त्रुटी असणार्या प्राथमिक शिक्षकांनी आपले त्रुटी तात्काळ पूर्ण करून जिल्हा कार्यालयास सादर करावयाची आहे. निवड श्रेणी संदर्भात पुढील आठवड्यात प्रस्ताव छाननी करून आदेश निर्गमित केले जाणार आहेत. या संदर्भात काही अडचण असल्यास शिक्षक परिषदेत संपर्क करावा. वेतनश्रेणी मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारणार आस्थापना कनिष्ठ सहाय्यक सुनील गिरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.








