नंदुरबार | प्रतिनिधी
सुरत येथील व्यवसायीकाचा नवापुर येथे धारदार शस्त्राने खून करणार्या दोन संशयीत आरोपींना नंदुरबार पोलीसांनी सुरतमध्येच बेड्या ठोकल्या असुन,उर्वरीत संशयीत आरोपींना शोधण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१७ जुन रोजी नवापुर शहरातील बि.एस.एन.एल ऑफिसच्या पुढे धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मधोमध एका कारच्या मागच्या सीटवर एका इसमाच्या हाता पायावर व तोंडावर धारधार शस्त्राने वार करुन तोंडावर प्लॅस्टिक चिकटपट्टी चिकटवुन त्याला जिवेठार मारल्याने नवापुर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक धिरज प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन नवापुर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द् खूनाचा गून्हा नोंदविण्यात आला. तसेच घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पोलीस अधीक्षक नंदुरबार महेंद्र पंडीत यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन गून्हा उघडकिस आणण्यासाठी सुचना दिल्या. मयताच्या खिशात ऑनलाईन जेवणाची ऑर्डर दिल्याची पावती होती.व त्या पावतीवर त्याचा मोबाईल नंबर होता.त्यावरुन मयताची ओळख पटविण्यात पथकाला यश आले होते. मयत हा भावेशभाई सी. मेहता रा. घनश्यामभाई सोसायटी, सुरत (गुजरात) असल्याचे समजुन आल्याने मयताच्या घरी सदर घटनेबाबत कळवुन मयताची खात्री करण्यासाठी त्यांना नवापूर येथे बोलविण्यात आले होते. मयताच्या भावाने त्यास ओळखल्याने मयताची खात्री झाली होती. गुन्ह्याचा पहिला टप्पा पार करण्यात पथकाला यश आले होते, परंतु मयत सुरतहुन नवापुर येथे का आला व त्याचे मारेकरी कोण ? का मारण्यात आले ? हे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे होतेच, म्हणून पोलीसांनी घटनेच्या आजु-बाजुच्या परीसरात तसेच नवापूर शहरातुन जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सर्व हॉटेल, लॉजेस, पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. त्यात दि.१६ जुन रोजी नवापूर शहरातील हॉटेल कुणाल येथे मयत व त्यासोबत इतर ५ ते ६ इसम हॉटेलमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसले.तसेच दि.१७ जुन रोजी म्हणजेच घटनेच्या दिवशी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील हॉटेल र्उवशी येथे देखील ते ५ ते ६ संशयीत आरोपी दिसून आल्याने आरोपी निश्चीत झाले. मयत हा सुरत येथील असल्याने व मिळालेले सी.सी.टी.व्ही. फुटेजवरुन पोलीस अधीक्षक नंदुरबार महेंद्र पंडित यांनी एक पथक तात्काळ सुरत येथे रवाना करुन स्वत: गुन्ह्याबाबत वेळोवेळी माहिती घेत होते.
नंदुरबार पोलीस पथकाने अथक परीश्रम घेत सलग ३ दिवस अहोरात्र मेहनत घेवुन सुरत सारख्या शहरात बातमीदार तयार करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेले संशयीत हे सुरत, नवसारी येथे दारुची अवैध तस्करी करणारे व पैसे घेवुन गुन्हा करणारे (सुपारी किलर) असल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळवली, त्यावरुन आरोपीतांचा शोध घेण्यात येत होता. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नंदुरबार पोलीसांचे अजुन एक पथक तयार करुन नवसारी गुजरात राज्यात रवाना केले. सुरत येथील पथकाने अथक परिश्रम घेत सी.सी.टी.व्ही. फुटेजमध्ये दिसत असलेला एक आरोपीचे घर शोधुन काढले. पथकाने संशयीत आरोपीच्या घराच्या आजु-बाजुला सलग ४ दिवस वेशांतर करुन पाळत ठेवुन दि.१९ जुन रोजी एक संशयीत इसम आकाश रमेशभाई जोरेवार रा. आंबेडकर नगर, सुरत आरोपीला सुरत यास शहर गुन्हे शाखेच्या मदतीने शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यास खूनाबाबत अधिक विचारले असता त्याने त्याचे इतर साथीदारांची नावे सांगुन त्यास मयताला मारण्याचा हेतु काय बाबत विचारले असता त्याने सांगितले की, अवैध दारु तस्करीच्या व्यावसायातील वादातुन खून केला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याचे इतर साथीदारांचा शोध घेतला असता दि.२३ जुन रोजी गुन्ह्यातील अजुन एक संशयीत आरोपी आकाश अरविंदभाई ओड रा. अंबिका नगर, सुरत यास ताब्यात घेण्यात पथकास यश आले.
आरोपीतास नंदुरबार येथे आणून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वत: विचारपुस केली. आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली देवुन खुन का केला याबाबत सविस्तर माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना नवापुर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असुन उर्वरीत आरोपीतांचा कसुन शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप-विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराम गवळी, नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सह.पोलीस निरीक्षक धिरज महाजन, संदीप पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, रविंद्र पाडवी, प्रमोद सोनवणे, मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, पोलीस नाईक राकेश वसावे, विशाल नागरे, जितेंद्र ठाकुर, दादाभाई मासुळ, राकेश मोरे, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे पोलीस अमंलदार राजेंद्र काटके यांच्या पथकाने केली आहे.