नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील आरटीओ ऑफिसजवळ पेट्रोल पंपाचे लायसन्स काढून देण्याचे आमीष दाखवून एकाची सुमारे १० लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील कोकणी हिल परिसरातील दमयंती नगरातील अमरसिंग रामु वळवी यांनी भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे लायसन्स मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन ऑनलाईन अर्ज केला होता.
अमरदिप धामा (पूर्ण नाव माहिती नाही) याने त्याच्या मोबाईलवरुन अमरसिंग वळवी यांना वेळोवेळी संपर्क साधून भारत पेट्रोलियम कंपनीचा डिलरशिप मॅनेजर असल्याचे सांगत व्हाटसअॅपवर बनावट कागदपत्रे पाठवून अमरसिंग वळवी यांचा विश्वास संपादन केला.
तसेच अमरसिंग वळवी यांच्याकडून वेळोवेळी १० लाख ४ हजार ८०० रुपये घेवून पेट्रोल पंपाचे लायसन्स न देता फसवणूक केली. याबाबत अमरसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अमरदिप धामा याच्याविरुद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६८, ४१७ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.