म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील शेतकर्याची कांदे व्यापार्याकडून फसवणूक झाली असून बोली केलेल्या भावाप्रमाणे पैसे देण्यास नकार देत आहे. शिवाय पैसे देण्यासही टाळाटाळ करत आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, जयनगर येथील शेतकरी कृष्णा आनंदा वाघ या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रात उन्हाळी लाल कांद्याची लागवड केली होती. बाजारात भाव कमी असल्याने सदर शेतकऱ्याने आपला माल चौगाव, तालुका, जिल्हा धुळे येथील कैलास बोरसे या व्यापाराला सात रुपये किलो प्रमाणे बारा टन कांदे 6 मे रोजी मोजून दिले.
संबंधित व्यापारी सदर शेतकऱ्याला आठ दिवसात पैसे देतो असे सांगत कांदे घेऊन गेला. मात्र आज रोजी सतरा दिवस होऊन गेले तरी संबंधित शेतकऱ्याला पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे.
शिवाय सात रुपये किलो दराप्रमाणे कांदा खरेदी केलेला असला तरी माझ्याकडे पैसे येतील तेव्हा चार रुपये दराप्रमाणे पैसे देईल, असे संबंधित शेतकऱ्याला फोनवर बोलणे झाल्यावर सांगत आहे. 12 टन कांदे सात रुपये किलो दराप्रमाणे व्यापारी घेऊन गेला असून एकूण 84 हजार रुपयांनी सदर शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे.
सदर शेतकऱ्यांने दोन एकर क्षेत्रात 50 हजार रुपये खर्च लावून रात्रंदिवस पाणी भरून कांदे पिकविले. मात्र शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्याची फसवणूक करून पैसे देत नसल्याने पुढील पीक लागवडीसाठी सदर शेतकऱ्याकडे भांडवल नसल्याने खरीप हंगामात पिकांची लागवड करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.