नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील काकरपाटीचा अंबाबारीपाडा येथे झाडावरुन आंबे तोडून घेवून चोरी करुन घरी लपवून ठेवल्याच्या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील अंबाबारीपाडा येथील रकमानसिंग टेंबऱ्या वसावे याने सामा आरशी वळवी यांच्या झाडावरील आंबे तोडून घेवून चोरी करुन घरी लपवले.
या कारणावरुन रकमानसिंग वसावे यांना सामा आरशी वळवी, खेमा आरशी वळवी, वाल्या सामा वळवी, लालसिंग सामा वळवी, रिना आरशी वळवी, फुलीबाई सामा वळवी व मांगाबाई सामला वळवी सर्व रा.पाडलीचा पुतीपाडा ता.धडगाव यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली.
यावेळी रकमानसिंग वसावे यांची पत्नी अनिता वसावे या सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत रकमानसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.स्वप्निल गोसावी करीत आहेत.