नंदुरबार l प्रतिनिधी
प्राण्यांना होणारे क्लेश रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली आहे.
जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उ. दे. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार शहरासह जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करावी. तसेच यापैकी काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.पाळीव प्राणी पाळण्यासाठी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, नंदुरबार, धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे व पेट शॉप ॲक्टनुसार नोंदणी करणे, ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्टनुसार डॉग ब्रीडिंग सेंटर नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी सांगितले.