नंदुरबार l प्रतिनिधी
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2021- 22 मध्ये सर्वोत्कृष्ट कल्पनातंर्गत शासकीय संस्था गटात तहसिलदार गिरीष वखारे, तहसिलदार मंदार कुळकर्णी यांना आज मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्वोकृष्ट कल्पना अंतर्गत शासकीय संस्था वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार गिरीश वखारे, तहसिलदार, तहसिल कार्यालय, तळोदा, नंदुरबार ,पारितोषिकाचे स्वरुप रोख पन्नास हजार रु, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पुरस्कार मंदार कुलकर्णी, तहसिलदार, तहसिल कार्यालय, नवापूर, नंदुरबार पारितोषिकाचे स्वरुप तीस हजार रु., सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
तळोदा तहसिल कार्यालयात त्यांनी उपलब्ध जागेचा पर्याप्त व सुनियोजितपणे वापर करुन तहसिल कार्यालयात वाहनतळ तयार करुन पार्किंगसाठी शिस्त लावली. तर तहसील कार्यालय, नवापूर कार्यालयाने अभिलेख कक्षाचे नूतनीकरणाचा उपक्रम राबविला होता.