नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सोन बुद्रुक गावांतील रेशन दुकानावर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून मार्च महिन्याचे मोफ़त धान्य वितरीत होत असतांना अजब प्रकार पाहायला मिळाला आहे, रेशन लाभार्थ्यांना दिला जाणारा तांदूळ भेसळयुक्त अत्यंत निकृष्ट दर्जाचा वाटप करण्यात आला आहे.

तांदळात सिमेंट सदृश्य पदार्थ, गहू आणि विमल गुटख्याच्या पुढी आढळून आल्याने लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांचा विरोध करत धान्य घेण्यास नकार दिला.
याबाबत रेशन दुकानदार मगन पावरा यांनीही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. धडगाव सारख्या अतिदुर्गम भागात गरीब जनतेला खरोखरच मोफत राशन द्यायचं असेल तर शासनाने चांगल्या दर्जाचे द्यावे अशी मागणी केली आहे. सदर तांदूळ की गहू हे ओळखणे कठीण आहे याला खावे कसे असा प्रश्न उपस्थित करत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
धडगाव तालुक्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना याबाबत विचारले असता पुरवठा निरीक्षक यांना पाठवून याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत व आदिवासी जनजागृती टीमच्या वतीने तहसीलदारांना तक्रारी अर्ज देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.








