नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यात अवैध विक्रीच्या उद्देशाने कंटेनर मध्ये भरलेला सुमारे २५ लाखाचा मद्यसाठा व सुमारे १६ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण सुमारे ४१ लाखाचा मुद्देमाल अक्कलकुवा पोलिसांनी जप्त करत कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतून सीमेलगत असलेल्या मध्य प्रदेश व गुजरात राज्यात अवैध रीतीने वाहतूक होणाऱ्या मद्यसाठावर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

अक्कलकुवा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नेत्रंग शेवाळी महामार्गावरील अक्कलकुवा शहरा जवळ असलेल्या हरी पॅलेस येथे कंटेनर क्रमांक एम एच ०४ जे यु ४१२५ क्रमांकाच्या संशयित कंटेनर पोलीस निरीक्षक पठाण पोलीस यांच्या पथकाने कंटेनरची चौकशी केली केली असता या कंटेनरमध्ये गुजरात राज्यात अवैधपणे मद्य घेऊन जात असल्याचे आढळले, कंटेनरला अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आणून बॉक्स मध्ये असलेल्या देशी, विदेशी मद्यासह बियर असा सुमारे २५ लाखाचा मद्यसाठा मिळाला तसेच कंटेनरची सुमारे सोळा लाख रुपये किंमत असे एकूण ४१ लाख रुपयांच्या मुद्देमाल मिळून आला अक्कल्कुवा पोलीस ठाण्यात हा मद्यसाठा उतरवून रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती. शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.








