नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल ते नर्मदानगर एम डी आर १ ते एम डी आर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या रस्त्याचे आज एका बाजूने भाजपाच्या खा.डॉ.हिना गावीत तर दुसऱ्या टोकाला भाजपाचे आ.राजेश पाडवी यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
भुमिपूजनानंतर खा.डॉ.हीना गावित म्हणाल्या की,
नवापूर येथे एका कामाचे भुमिपूजन केले, त्या कार्यक्रमाला तेथील कॉंंग्रेसचे आ.शिरीषकुमार नाईक यांना मी आमंत्रीत केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.राजेश पाडवी यांना देण्यात आले होते. यासाठी काल आ.पाडवी यांना संपर्क करण्यात आला होता. परंतू त्यांच्या स्विय सहाय्यकांनी माझ्या स्विय सहाय्यकाशी अत्यंत शिवराळ भाषेत बोलून ठेकेदाराचे हातपाय तोडण्याची भाषा केली. ही बाब अत्यंत अशोभनीय असून ही आपल्या जिल्हयाची राजकीय संस्कृती नाही, कॉंग्रेसच्या आमदाराला बोलवू शकते तर आ.पाडवी तर भाजपाचेच आहेत त्यांना डावलणे शक्यच नाही.अशी प्रतिक्रिया खा.डॉ.हीना गावित यांनी दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, केंद्राने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही दोन्ही भाजपाचे लोकप्रतिनिधी आहोत. या कामाच्या भुमिपूजनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी काल माझ्या स्विय सहाय्यकाने आ.पाडवी यांच्या स्विय सहाय्यकाला फोन करुन कार्यक्रमाची कल्पना दिली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.पाडवी यांना सन्मानाने देण्यात येणार होते. परंतू त्यांना रस्ता मंजूर आहे, हेच माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी रस्त्याची पूर्ण माहिती घेतली त्यानंतर त्यांच्या स्विय सहाय्यकाने माझ्या स्विय सहाय्यकाला अत्यंत शिवराळ भाषेत संभाषण केले.तसेच ठेकेदाराच्या तंगडया तोडण्याची भाषा करुन पक्षात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे कदापीही सहन केले जाणार नाही. असा प्रकार नंदुरबारच्या इतिहासात कधीच झालेला नाही, कारण ही आपली राजकीय संस्कृती नाही.एका लोकप्रतिनिधीच्या त्याही महिला लोकप्रतिनिधीच्या स्विय सहाय्यकाशी अशी भाषा करणे हे स्विय सहाय्यकाला तसेच आमदारालाही शोभत नही. म्हणून आ.पाडवी यांनी याप्रकरणी माफी मागावी, असे खा.डॉ.गावित म्हणाल्या.








