नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील डोगेगाव येथील रहिवासी सुनिल गावित याची महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये निवड झाली असून पुणे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात लेदर बॉल क्रिकेट खेळण्याची संधी सुनिल गावितला उपलब्ध झाली आहे.
आयपीएल सामने संपल्यानंतर पुणे येथे लेदर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी सुनील गावित रवाना होणार आहे. राईट आर्म मध्यम पेस बॉलर ( मध्यमगती गोलंदाज) असलेल्या सुनील गावितची निवड झाल्याबद्दल मित्र व परिवाराकडून कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. १७ मार्च रोजी नाशिक येथे संदिप फाउंडेशन ग्राउंडवर निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीत १० ओवरमध्ये २९ रन देत ७ विकेट पटकावल्या होत्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सुनीलची महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये निवड झाली आहे.
डोगेगाव येथील सामान्य आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुनिल गावितला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. गेल्या दहा वर्षापासून क्रिकेट खेळाला अधिक महत्त्व देत एक चांगला क्रिकेटपटू बनण्याचे ध्येय निश्चित करून टेनिस बॉल मधुन आता लेदर क्रिकेट खेळामध्ये पदार्पण करत असल्याची माहिती सुनील गावितने दिली आहे. महाराष्ट्र क्रिकेट लिग मध्ये चांगलं प्रदर्शन करून रणजी क्रिकेट मध्ये निवड करण्याचे ध्येय सुनिल गावितने आखलं आहे.
गेल्या वर्षी मध्यप्रदेश येथे सुनिल गावित सह नंदुरबार जिल्ह्यातील आठ क्रिकेटपटूंनी टेनिस क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित मध्यप्रदेश येथील देवास मैदानात महाराष्ट्र संघातून खेळून अंतिम विजेतेपद पटकावून दिलं होतं यामध्ये सुनिल गावित यांनी अंतिम सामन्यात हॉड्रिक साधून महाराष्ट्र संघाचा विजय सुकर केला होता. त्याच्या या अष्टपैलू खेळामुळे आता महाराष्ट्र क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
मूळचा नवापुर तालुक्यातील डोगेगाव येथील सामान्य कुटुंबातील सुनिल गावितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे ध्येय निश्चित करून चांगली कामगिरी सुरू केली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल मित्र परिवाराने नेहमी साथ दिली आहे. परिवारात आई-वडील व चार भावंडे असा सुनिल यांचा परिवार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्यासाठी वारसा व आर्थिक परिस्थिती, पाहिजे तसं मार्गदर्शन नसलं तरी आपल्या मेहनतीने क्रिकेटचे मैदान गाजवण्याची क्षमता व जिद्द सुनिलच्या अंगात ठासून भरलेली आहे, त्यामुळे एका सामान्य परिवारातील सुनिलला महाराष्ट्र क्रिकेट लीग मधून रंणजी ट्राफि तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे यश संपादन व्हावे हीच अपेक्षा. आता त्याला गरज आहे ती पुणे-मुंबई दिल्लीसारख्या नामवंत क्रिकेट क्लब मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रशिक्षणाची, मात्र चांगल्या क्रिकेट क्लब मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ओळख व आर्थिक परिस्थिती नसल्याने मदत करावी अशी अपेक्षा सुनिलने व्यक्त केली आहे.