तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील लक्कडकोट, हाडंबा व सितापावली अशा तीन आदिवासी पाड्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागाने विजेसाठी निधी मंजूर केल्या नंतर पंचायत समितीच्या सभापती यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.स्वातंत्र्य नंतर तेथे प्रथमच वीज पोहचणार असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
तळोदा तालुक्यात बहुसंख्य आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही वीज पोहचलेली नाही.त्यामुळे तेथील रहिवाशांना अंधाराच्या साम्राज्यात राहावे लागत असे.त्याचबरोबर जंगली श्वापदांचाही सामना करावा लागत होता.परिणामी विजेपासून वंचित लक्कडकोट,हादंबा व सितापावली येथील ग्रामस्थांनी आपल्या पाड्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या दोन,तीन वर्षांपासून वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शिवाय लोकप्रतिनिधी यांनी देखील सबंधित यंत्रणेला निधीच्या प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली होती.या शिवाय बिरसा फायटर या सामाजिक संघटनेने देखील सतत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत हा प्रश्न लावून धरला होता.त्याचे फलित म्हणून बांधकाम विभागाच्या विद्युत यंत्रणांनी वरिष्ठांकडे निधी मंजुरीसाठी संवाद साधून प्रत्येकी साधारण दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला.त्यामुळे या तिन्ही आदिवासी पड्याना विजेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने टेंडरची युद्ध पातळीवर प्रक्रिया करून लक्कडकोट येथे या कामाचे भूमिपूजन पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हिरालाल पाडवी,जगणं पाडवी,दिनेश वळवी,लक्ष्मण पाडवी,बळीराम पाडवी,संजय पाडवी, रायसिंग पाडवी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.देशाच्या स्वातंत्र्य नंतर प्रथमच येथे वीज पोहचणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.तथापि सबंधित यंत्रणांनी काम पूर्ण होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर निधीतून पूर्ण क्षमतेने रोहित्र,विद्युत खांब व वीज तारांचे काम करण्यात येणार आहे.








