नवी दिल्ली
देशातील महामार्गावरील प्रवास तीन महिन्यानंतर स्वस्त होणार आहे. कारण सरकार 60 किलोमीटर अंतरावर एकदाच टोल घेणार आहे. यासोबतच महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांनाही सवलत दिली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत माहिती दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकार येत्या ३ महिन्यांत देशातील टोलनाक्यांची संख्या कमी करेल. ६० किमीच्या अंतरावर एकच टोलनाका असेल. आज लोकसभेत हे विधान करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ६० किमीच्या परिसरात येणारे टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील. त्याचवेळी टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागणार नाही, त्यांना पास जारी केला जाईल. यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. तसेच अधिकाधिक लोक टोल भरून महामार्गावरून प्रवास करण्यास प्रवृत्त होतील. खरे तर महामार्गावरील वाहतूक वाढवून टोलचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर आहे. त्याचबरोबर टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. कारण स्थानिकांना हायवेवरून सतत प्रवास करावा लागतो. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्यांनाही सरकारच्या या नव्या योजनेचा lलाभ मिळणार आहे.