नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खेकडा येथे गुरांचा चारा जाळून टाकल्याच्या संशयावरुन एकास कुऱ्हाडीने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील खेकडा येथील अर्जुन ठोग्या मावची यांनी संजय दिनकर मावची यांच्या मालकीचा गुरांचा चारा जाळून टाकल्याच्या संशयावरुन अर्जुन मावची यांना संजय मावची याने कुऱ्हाडीने वार करुन दुखापत केली. तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. याबाबत अर्जुन मावची यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात संशयित संजय मावची याच्याविरोधात भादंवि कलम ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुमानसिंग पाडवी करीत आहेत.