नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी येथील विवाहितेस जाळून मारुन टाकल्याप्रकरणी 10 वर्षांचा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा पतीस शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहादा तालुक्यातील वडाळी येथील अनिल सदगीर गोसावी यांचे लग्न वेळोदा ता.चोपडा जि. जळगाव येथील अनिता विश्वास गोसावी हिच्याशी सन 2006-07 साली लग्न झाले होते. लग्नानंतर अनिता ही सासरी वडाळी येथे आरोपी सोबत प्रपंच करण्यास आली असता अनिल सदगीर गोसावी यांच्याकडून वेळोवेळी अनिताचा त्रास देवून छळ केला जात होता. परंतू अनिता सर्व त्रास सहन करून अनिल सदगीर गोसावी यांच्यासोबत संसार करीत होती. दरम्यानचा काळात उभयंतांना सागर व जानव्ही असे अपत्य आहेत.
दि.26 मे 2016 रोजी अनिताने बचत गटातून 20 हजार रुपये कर्ज काढून आणले नाही या कारणावरून वाद उपस्थित करून अनिल गोसावी याने पत्नी अनिताच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकले. अनिता गंभीररित्या जळालेली असल्याने धुळे येथे उपचार सुरु होते. अनिताचे मृत्युपुर्व जबाब नोंदविण्यात आल्यानंतर मृत्युपुर्व जबाबाच्या अनुषंगाने अनिल सदगीर गोसावी याच्याविरूद्ध सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरक्षक कृष्णा दाभाडे यांनी केला. धुळे येथे उपचार घेत असतांना दि. 31 मे 2016 रोजी अनिता मयत झाली.
याबाबत अनिल गोसावी याच्याविरुद्ध शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने भा.दं.वि. कलम 302 अन्वये दोष निश्चिती केली. न्यायालयात अभियोग पक्षातर्फे सदर गुन्हयातील 15 साक्षीदार तपासण्यात आले. सदर गुन्हयाचे संबंधात आवश्यक कागदोपत्री पुरावा व साक्षीदारांचा आलेला पुरावा लक्षात घेवून न्या. व्ही.एम. पथाडे यांनी आरोपी अनिल सदगीर गोसावी यास भा.दं.वि कलम 304/1 अन्वये दोषी धरून 10 वर्षाचे सक्तमजूरीचा कारावास व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.यशवंतराव मोरे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अविनाश बिरारे यांनी कामकाज पाहिले.








