नंदुरबार l प्रतिनिधी-
टेम्पो ट्रॅव्हल साठी घेतलेले 36 लाखाचे कर्ज खाजगी फायनान्स ला परत केल्यानंतरही तीन लाखांसाठी वारंवार तगादा लावल्याने कंटाळून कर्जदाराने पत्नीसह खाजगी फायनान्स कार्यालयात पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना नंदुरबार शहरात घडली. पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर दोन तासानंतर या वादावर पडदा पडला.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील रहिवाशी अशोक पाटील यांनी सन.२०१७ मध्ये टेम्पो ट्रॅव्हल्स खरेदी करण्यासाठी संबंधित खासगी फायनान्स कंपनीकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर कोरोना काळात कंपनीने त्यांना रि-लोन उपलब्ध करून दिले. या कर्जापोटी आतापर्यंत तब्बल ३६ लाख रुपये भरल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, एवढी मोठी रक्कम भरूनही संबंधित फायनान्स कंपनीकडून पुन्हा तीन लाख रुपयांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप अशोक पाटील यांनी केला. खाजगी फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून अशोक पाटील यांनी पत्नीसह कंपनीचे कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांनी टोक्याचे पाऊल उचलत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना रोखले. मात्र, कंपनीचा त्रास थांबला नाही तर पुन्हा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू, असा इशाराही पाटील यांनी दिल्याचे समजते.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कर्जाची नेमकी स्थिती आणि कंपनीची बाजू समजू शकली नाही.








