नंदुरबार l प्रतिनिधी-
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026 या अंतर्गत शहादा येथील तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या विशेष शिबिरात माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित व भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, प्रांताधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी महेश पोदार, तसेच परिसरातील सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
उपस्थित ग्रामस्थांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका,जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, रहिवास / अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र यासह विविध कागदपत्रे पूर्ण करून वितरित करण्यात आले.
यावेळी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. योजनांचे स्वरूप, पात्रता निकष आणि लाभ मिळविण्याची प्रक्रिया याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध सेवांचे प्रत्यक्ष वितरणही करण्यात आले.








