नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा परिसरातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, प्रांताधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, गटविकास अधिकारी महेश पोदार, तसेच परिसरातील सर्व गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
बैठकीमध्ये परिसरातील पाणीटंचाईची सद्यस्थिती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींची स्थिती, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना, जलसंधारणाची कामे, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
दुर्गम भागातील गाव-पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना वेळेत कराव्यात, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे, बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करणे आणि नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेणे यावर भर देण्यात आला.
तसेच जलसंधारण, नाला खोलीकरण, विहिरींचे पुनर्भरण, शेततळी आणि पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित व डॉ.सुप्रिया गावित यांनी प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वयाने काम करून जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
“जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये आणि दुर्गम भागातील प्रत्येक गाव-पाड्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करणे आवश्यक आहे.”
दुष्काळ निवारणासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय ठेवून प्रभावी उपाययोजना राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








