नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील महात्मा गांधी जयंतीनिमित्त के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात, विद्यार्थ्यांनी स्वच्छता रॅली तसेच परिसर स्वच्छता अभियान राबवत ग्रामस्थांना स्वच्छतेचा प्रभावी संदेश दिला.
‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेला अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयक विविध घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. रॅलीदरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ अशा घोषणांमधून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी पथराई ग्रामपंचायत परिसर तसेच गावातील मुख्य चौकात स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत परिसरातील कचरा साफ करून स्वच्छता ही केवळ एका दिवसाची नव्हे, तर दैनंदिन जीवनशैलीचा भाग असावी, असा संदेश आपल्या कृतीतून दिला.
याप्रसंगी पथराई ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर पाटील, ग्रामस्थ, प्राचार्य शरद पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद संदानशिव यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती स्वाती पाटील व श्रीमती नीलिमा पवार यांनी केले.











