नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचलित माध्यमिक विद्यालय, खोकराळे येथे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोप पावत चाललेल्या पारंपरिक ग्रामीण खेळांच्या शालेय अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्याध्यक्ष विजय बोरसे व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या प्रेरणेने झालेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देहाती खेळांची आवड निर्माण करणे व पारंपरिक खेळांचे जतन करणे हा होता.
या अंतर्गत एक ऑक्टोबर रोजी ‘चौपट चौपट’, दोन ऑक्टोबर रोजी ‘भेटकार्ड तयार करणे’ आणि तीन ऑक्टोबर रोजी ‘लगोरी लगोरी’ स्पर्धा घेण्यात आल्या. चौपट चौपटमध्ये लहान गटात इयत्ता सातवीतील भावेश धनगर , तर मोठ्या गटात नववीतील गोपाळ भिल यांनी प्रथम क्रमांक मिळविला. भेटकार्ड तयार करण्याच्या स्पर्धेत वैष्णवी राजपूत व हर्षदा राजपूत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
लगोरी लगोरी स्पर्धेत मुलांच्या गटात प्रेम धनगर यांच्या संघाने, तर मुलींच्या गटात वैष्णवी राजपूत यांच्या संघाने विजेतेपद मिळविले. स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेते व सहभागी विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले. स्पर्धांच्या आयोजनासाठी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.











