नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील शासकीय कृषि महाविद्यालयात राष्ट्रीय पर्व अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात संविधानाप्रती निष्ठा आणि राष्ट्रभक्तीच्या जयघोषात दिमाखात राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. यू. बी. होले यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि योगदानाचे स्मरण केले. तसेच, देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात आणि अन्नसुरक्षेत कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक व विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने कृषीकन्या व कृषीदूत विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व भारत माता की जयच्या जयघोषाने करण्यात आली.








