नंदुरबार l प्रतिनिधी-
हिंदू रष्ट्र स्थापन व्हायचे असेल तर राजनीतीचे हिंदूकरण करणे आणि मतदारांनी हिंदू सैनिक बनणे काळाची गरज आहे. राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टीने धर्म अध्यात्म आणि संस्कृती विषयीच्या धारणा प्रत्येक हिंदू धर्मियाने समजून घेतल्या तरच ते शक्य आहे; असा संदेश कालिपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी नंदुरबार येथील विराट हिंदू धर्म जागृती सभेत दिला. याचे महत्त्व जाणले नाही तर चहू बाजूने माजलेल्या दृष्ट शक्ती तुमचा विनाश करतील हे स्पष्ट आहे; असा इशारा देखील कालीचरण महाराज यांनी दिला.
नंदुरबार येथील हिंदु सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभेला संबोधित करताना कालीपुत्र कालीचरण महाराज बोलत होते. रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल मैदानात ही सभा पार पडली. पू. उध्दव महाराज, पू. खगेंद्र महाराज बुवा, पू. राजीव जी झा महाराज, पू. श्यामजी महाराज, पू देवेंद्र पांढारकर महाराज, पू पंडित रविंद्र पाठक गुरुजी, पू. प्रतापदादा वसावे महाराज, पू अजबसिंग पाडवी महाराज भाती संप्रदाय, पू. विलास महाराज जोशी, शंकर वराडकर : राष्ट्रीय महामंत्री श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास मथुरा आणि हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
हिंदू सेवा सहाय्य समितीचे अध्यक्ष तथा धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील यांनी प्रास्तविक भाषणात, इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रा हिंदू सेवा सहाय्य समितीचे कार्य पोहोचवले जाणार असल्याची घोषणा केली. श्री कृष्णाची जन्मभूमी मुक्त करण्यासाठी नाशिक विभागातुन मोठे आंदोलन उभे केले जाईल, असेही घोषित केले. त्या आधी समितीचा कार्य परिचय डॉ नरेंद्र पाटील यांनी करून दिला.
कालीचरण महाराज यांनी अत्यंत साध्या सोप्या शब्दात परंतु प्रभावीपणे धर्म अध्यात्म आणि राष्ट्रीयत्व याचा परस्पर संबंध विश्लेषित केला. त्यांनी सांगितले की, कोणालाही भेटल्यानंतर राम राम म्हणण्याची परंपरा आहे ती अमलात आणा. कपाळावर रोज टिळा लावा. संस्कृतीचे पालन करा. अशा स्वरूपात अंतर्बाह्य हिंदू बना. आम्ही मनातून हिंदू आहोत असे म्हणणारे दुटप्पी असतात त्यांच्यापासून सावध राहा.आपल्या आतील दुर्गुणांचा आणि समाजातील वाईट प्रवृत्तीचा नाश करतो तो खरा हिंदू. आपला धर्म आपली संस्कृती याविषयीची ही धारणा घट्ट बनवा. धारणा पक्की असेल तरच तुम्हाला अध्यात्म आणि धर्माच्या वाटेवर चालता येईल. अहिंसा आणि माणुसकी महत्त्वाची; असे म्हणणारे मूर्ख आहेत. कारण काहीही करून म्हणजे कुकर्म करून सुख मिळवू पाहताना शेवट दुःखात होतो. त्या अर्थाने खरे सुख ईश्वर प्राप्तीत आहे आणि धर्म आपल्याला त्यासाठी कर्मफल सिद्धांत शिकवतो. म्हणून बिगर धर्माची माणुसकी जपणारा आणि सुखाच्या मागे धावणारा प्रत्येक व्यक्ती जनावर अथवा ढोर असतो.
हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी नेमके काय करावे, हे नमूद करताना कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, मंदिर सरकारीकरणातुन मुक्त करण्यासाठी, गोवंश हत्या मुक्त भारत करण्यासाठी, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी, हिंदूंचे संघटन प्रभावी करण्यासाठी, लव जिहादपासून हिंदू तरुणींचे रक्षण करण्यासाठी, हिंदूंना हिंदूंच्या हक्काचे हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण आधी संघटित झालो पाहिजे. प्रत्येक मुस्लिम मतदार त्याच्या इस्लामसाठी जागृत राहून मतदान करतो. त्या बळावर इस्लामीकरण करण्यात ते अर्धे यशस्वी झाले आहेत. हिंदू मतदारांनीसुध्दा आपल्या वोट बॅंकेची ताकद निर्माण केली आणि राजनीतीचे हिंदूकरण केले, तरच हिंदुराष्ट्र स्थापन करणे शक्य होईल. म्हणून आज प्रत्येकाने हिंदुत्वाचे सैनिक बनणे काळाची गरज आहे. देशभरातल्या 4 945 आमदार खासदारांच्या हातात राष्ट्र आहे. त्यांच्या हातात संविधान आहे. कायदे अमलात आणणे यांच्या सरकारच्या हातात असते. सरकार म्हणजेच राजा. हिंदू धर्म रक्षण करणारे कायदे सक्तीने अमलात यायचे असतील तर त्यासाठी आपला हा राजा प्रभू रामचंद्र सारखा असला पाहिजे छत्रपती सारखा असला पाहिजे. म्हणूनच रामराज्य यायचे असेल तर आपण प्रत्येकाने कट्टर हिंदुत्व जपणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे, हीच काळाची गरज आहे; असे कालीचरण महाराज म्हणाले.
*क्षणचित्रे*
*श्री कालीचरण महाराज यांचे आगमन होताच मैदानावरील उपस्थितांमधून जोरदार घोषणांचा जणू वर्षाव करण्यात आला.
* व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले.
* भाला आणि रुद्राक्ष माळ देऊन सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
* त्यानंतर “एक हातमें भाला दुजे हाथ में माला”अशा जोरदार घोषणा देत उपस्थित मान्यवरांनी हातात भाला आणि माळ घेऊन उपस्थित धर्मप्रेमींना उत्स्फूर्त संदेश दिला.
* “ओम काली” या मंत्रोचाराने श्री काली चरण महाराज यांनी भाषणाचा प्रारंभ केला. त्यानंतर अत्यंत प्रभावीपणे शिवतांडव गायन केले.
* शिवतांडव गायन चालू असताना उपस्थित धर्मप्रेमींनी टाळ्यांच्या स्वरूपात ताल धरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
* श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.








