नंदुरबार l प्रतिनिधी-
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाला शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे. तसेच त्यांना स्पर्धात्मक वातावरणात नवी ऊर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी व जलदगतीने अमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रितीने सेवा देणे, त्यांचे आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढणे यासाठी या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येत आहे.
सदर अभियान नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार व्हावा यासाठी आज मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीची सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीस त्यांनी भेट देत गावातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल ,ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुमार कुसुरकर, नंदुरबार पंचायत समितीचे बीडीओ ,शिवांश सिंग, नवापूर पंचायत समितीचे बीडीओ ,श्री देवरे, श्रीरामपूरचे सरपंच यशवंत गांगुर्डे, उपसरपंच निलेश अहिरे ,ग्राम विस्तार अधिकारी रूपाली देवरे , ग्रामपंचायत सदस्य ,मुकेश गांगुर्डे ,शांताराम गावित मीठाबाई अहिरे आदी उपस्थित होते.
यावेळी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामपंचायती मार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली. श्रीरामपूर गावात उभारण्यात आलेली डिजिटल वर्गखोली, सौरऊर्जा (सोलर पॅनल) प्रकल्प, महिलांसाठी सखी प्रेरणा भवन, तसेच व्यायामशाळा या विविध विकासकामांचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक केले. ग्रामीण विकासात लोकसहभाग महत्त्वाचा असून अशा उपक्रमांमुळे गावांचा सर्वांगीण विकास साधता येतो, शासनाची ही योजना आपल्यासाठी एक संधी आहे आणि या संधीचे आपण सोने करू शकतात या उपक्रमांतर्गत आपण स्पर्धेचे भाग होऊ शकतात ज्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचे नाव देश पातळीवर लौकिक होऊ शकते .
आज केलेल्या उद्घाटनामुळे या नावीन्यपूर्ण योजनेची सुरुवात झाली असून यातून सर्व नागरिक हे सक्षम बनतील संपूर्ण गाव सौर ऊर्जावर काम करीत आहेत ही गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असून हे काम असेच सुरू ठेवा. आजच्या डिजिटल व औद्योगिक युगात आपण आपली खाद्य संस्कृती व पेहराव जपून ठेवला आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
यावेळी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजना संदर्भात माहिती देत या योजना च्या माध्यमातून आपण गावांच्या सर्वांगीण विकास कसा साध्य करू असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असल्याचे चित्र नंदुरबार तालुक्यात पाहायला मिळाले आहे.








