नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील विविध बोली भाषांचा साहित्यिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘बोली जेव्हा बोलते’ या शीर्षकाखाली भव्य मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे काव्य संमेलन आदिवासी साहित्य अकादमी, चाळीसगाव (महाराष्ट्र)* व आदिवासी मौखिक साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे.
सदर काव्य संमेलन १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजे पासून नंदुरबार येथील कै. हेमलता वळवी सामाजिक सभागृह, पंचायत समिती नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील कवींना त्यांच्या मायबोलीतील स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.
आयोजकांच्या मते, या कवितांमधून गाव-वाड्यांच्या रोमांचक कहाण्या, निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, प्रेम-विरहाच्या कोमल भावना, दैनंदिन जीवनसंघर्ष आणि विद्रोहाची तीव्र जाणीव व्यक्त होणार आहे. हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून, नंदुरबारच्या सांस्कृतिक ओळखीला बळ देणारा आणि स्थानिक बोलीभाषांना मुख्य प्रवाहात आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
या काव्य संमेलनाला उद्घाटक म्हणून प्रभाकर भावसार तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील , प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, ज्येष्ठ साहित्यिक निंबाजीराव बागुल, ज्येष्ठ साहित्यिक सुनील गायकवाड तसेच अध्यक्षता ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.
काव्य सादरीकरणासाठी काही निमंत्रित कवी व काही नवोदित इच्छुक कवींनी आधी सहभाग नोंदविला आहे. मात्र ज्या कवींना या काव्यसंमेलनात आपली स्वरचित कविता सादर करायची असेल त्यांनी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक भीमसिंग वळवी, दादाभाई पिंपळे, प्रा.डॉ.मनोज शेवाळे, नागसेन पेंढारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील कवींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कविता अजरामर कराव्यात.








