नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून 30 ऑगस्ट 2025 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीस माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
‘खेलो इंडिया’ योजनेच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत दैनंदिन जीवनात फिटनेसचा समावेश करण्याच्या उद्देशाने, तसेच लठ्ठपणाशी लढण्यासाठी आणि संतुलित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. रॅलीची सुरुवात सकाळी 7-30 वाजता मोठा मारोती मंदिर, नंदुरबार येथून झाली. ही सायकल रॅली मोठा मारोती मंदिर, अंधारे चौक, महाराणा प्रताप चौक, डी. आर. हायस्कूल, आणि श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल या मार्गाने काढण्यात आली. श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, श्रॉफ हायस्कूलच्या प्राचार्या सुषमा शाह, माजी क्रीडा संचालक ईश्वर धामणे, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार आणि क्रीडा शिक्षक भिकू त्रिवेदी व हेमचंद्र मराठे आदि मान्यवर उपस्थित होते, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.