नंदुरबार l प्रतिनिधी
पावसाळा जवळ येत असताना जिल्ह्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांनी पूर्ण सतर्क राहावे, आपत्ती व्यवस्थापन आराखडे तातडीने तयार करून प्रशासनास सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आज मान्सूनपूर्व तयारीसंबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रवन दत्त एस., निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे, सहाय्यक जिल्हाधिकारी (नंदुरबार) अंजली शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी (शहादा), कृष्णकांत कनवारीया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (नंदुरबार) अंकुश पालवे, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना डॉ. सेठी म्हणाल्या,प्रत्येक विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य धोके ओळखून सर्वेक्षण करावे व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. स्थानिक पातळीवरील स्त्रोतांचा वापर करून विभागीय आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करावेत, व प्रशासनास त्वरीत सादर करावेत.ज्या विभागांनी अद्याप त्यांच्या आराखडे सादर केले नाहीत, त्यांनी प्रलंबित आराखडे तात्काळ पूर्ण करावेत. आपत्तीपूर्व, आपत्ती
काळातील व नंतरच्या टप्प्यातील क्रिया स्पष्ट असाव्यात. संबंधित विभागांनी या तीनही टप्प्यांसाठी कार्यवाही आराखडे तयार ठेवावेत.पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा साठा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवावी. पर्जन्यमापक यंत्रणा, धरणे, तलाव, मंडळ यंत्रणा यांची तपासणी करून दुरुस्ती गरजेची असल्यास ती त्वरीत पूर्ण करावी.पावसाळ्याच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातील, त्या अंमलात आणाव्यात. आपत्तीच्या काळात मुख्यालयात थांबून विभागीय समन्वय राखणे आवश्यक आहे.
बैठकीत उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी विविध विभागांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा सादर केला. विभागनिहाय सादर केलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली आणि उर्वरित प्रलंबित कामांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
डॉ. सेठी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून, संपूर्ण यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी सजग, तत्पर आणि उत्तरदायित्व स्वीकारून कार्यवाही करावी.”जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड, वीज गळती, अपघात, आजारपण अशा सर्व बाबी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे, तसेच विभागांनी स्वतःच्या यंत्रणाही सक्षम ठेवाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीमुळे आगामी पावसाळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अधिक ठोस, समन्वयित आणि प्रभावी होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.