नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, पणन महासंचलनालयाने बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पात नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती खानदेशात अव्वल ठरली असून, नाशिक विभागात तृतीय तर राज्यात १४ वा क्रमांक पटकावलेला आहे.
नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने 2023/24 या वर्षासाठी स्मार्ट प्रकल्पासाठी वस्तुनिष्ठ माहिती आवश्यक पुराव्यासह प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.त्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत पडताळणी झाली हा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने पणन महासंचालक,पुणे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी राज्यातील 305 बाजार समित्यांची 2023 24 या वर्षाची वार्षिक क्रमवारी जाहीर केली. त्यात एकूण 200 गुणांपैकी 143 प्राप्त करून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातून १४ वा क्रमांक पटकावलेला आहे.
क्रमांक पटकावल्याने अभिमान
बाजार समितीने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून व भविष्यातील बाजार समिती समोरील आव्हाने व स्पर्धा लक्षात घेऊन शेतकरी अडते, व्यापारी,हमाल,मापाडी व कामगार यांच्याकरिता आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना यापूर्वी इतर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी जावे लागत होते.त्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. आता स्थानिक ठिकाणीच हंगामी स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्यात आल्यामुळे सुविधा प्राप्त होऊन भाव देखील चांगला मिळत आहे. बाजार समितीने विभागातून तिसरा तर राज्यातून 14 वा क्रमांक पटकावला असल्यामुळे अभिमान आहे.
आ.चंद्रकांत रघुवंशी
शिवसेनेचे नेते,आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू आहे. कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता पाळण्यात येत असते. सभापती,उपसभापती, सचिव, संचालक मंडळ, कार्यालयीन कर्मचारी टीमवर्क म्हणून काम करीत असतात. क्रमांक पटकावल्याने काम करण्यास अधिक उभारी येणार आहे.
संध्या पाटील
सभापती, बाजार समिती
ही आहेत प्रकल्पाची ‘स्मार्ट’ उद्दिष्टे
🔴 लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे.
🔴 शेतकऱ्यांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वसमावेशक व्यवसाय आराखडया द्वारे कृषि व्यवसाय क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
🔴 कृषि व्यवसाय क्षेत्रात लघु व मध्यम उद्योगांच्या स्थापनेसाठी उत्तेजन देणे.
🔴 हवामान बदलाच्या अनुषंगाने कृषि क्षेत्रातील उत्पादन व व्यावसायिक जोखमींचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी हवामानाधारित कृषि उत्पादन व्यवस्थांच्या उभारणीस सहाय्य करणे.
🔴 कृषि व्यवसायांच्या उभारणीस बळकटी देणे, त्यांना अधिक बाजारपेठा उपलब्ध करुन देणे तसेच कृषि व्यवसायांची हवामान लवचिकता व संसाधन वापराची कार्यक्षमता वाढविणे.