नंदुरबार l प्रतिनिधी-
आम्ही तीस वर्षात या जिल्ह्याचा कायापालट घडवणारे जितके काम केले आणि निधी दिले तेवढे याच्यापूर्वी जिल्ह्यातील दुसरे कोणी केले का? यावर मतदार स्वतः चांगला जागरूक आहे आणि त्यामुळे मी केलेल्या विकास कामावरच ते शिक्का मारतील याचा मला विश्वास आहे. आम्ही तीस वर्षात या जिल्ह्याचा विकासच केला नाही, हा आरोप करणाऱ्यांना आणि आम्ही विकासाची कोणती कामे केली? असा प्रश्न करणाऱ्यांना जनता नक्कीच जागा दाखवेल; असा विश्वास नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपा तथा महायुतीचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित सध्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात भेट देऊन मतदारांशी संवाद साधत आहे. त्यासाठी गावागावात कॉर्नर सभा घेत आहेत.
या अंतर्गत त्यांनी रनाळे जिल्हा परिषद गटातील गावांना भेटी दिल्या. रजाळे, बलवंड, सैताणे, खर्दे, बैंदाणे, आसाने, तलवाडे बु., रनाळे, उमर्दे खु., नांदखें, वासदरे, पिंप्री व अन्य गावांमधील मतदारांशी संवाद साधून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान कॉर्नर सभेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
भाषणात ते पुढे म्हणाले, मतदान करताना मतदार जर एकदा चुकला तर पूर्ण मतदार संघ पाच दहा वर्ष मागे जातो. म्हणून स्वतःच्या स्वार्थापायी लोकांची दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांना आणि नेत्यांना भुलू नका. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंत अनेक नेते घडून गेले परंतु बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, दारिद्र्य गरिबी याने ग्रासलेल्या इथल्या वंचित समूहाचा कोणताही विकास झालेला नव्हता.
परंतु तीस वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आणून मी विकासाला गती दिली. विविध प्रकारचे पाणी प्रकल्प पूर्णत्वास आणले प्रत्येक गावासाठी रस्ते पाणी विज देण्याबरोबरच शेती विकास करणाऱ्या योजना राबवल्या. केवळ विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार आपण निवडून दिला म्हणून हे घडले. आताही सर्व मतदारांनी विकास कार्य गतिमान ठेवण्यासाठी जाती धर्मावर आधारित दिल्या जाणाऱ्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.